Wednesday, October 1, 2014

वादग्रस्त नितेश राणेंचे 'उद्योग'

४ डिसेंबर २०१३
'बाप से बेटा सवाई' असं कुणी म्हटलं की, वडिलांना आपल्या मुलाचा अभिमान वाटतो... परंतु 'स्वाभिमान संघटने'चे अध्यक्ष असलेल्या नितेश राणेंच्या 'उद्योगां'मुळे प्रत्येकवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री नारायण राणे अडचणीत आलेत... आता देखील गोव्याच्या चेकनाक्यावर तोडफोड करून नितेश राणेंनी आपले 'उद्योग' मागील पानावरून पुढे सुरूच ठेवलेत....
...............

व्हिओ -
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, तिन्ही लोकी लावी झेंडा...
या संत तुकारामांच्या अभंगाचा शब्दशः अर्थ उद्योगमंत्री नारायण राणे यांचे धाकटे सुपुत्र नितेश राणे यांनी घेतलेला दिसतो... त्यामुळेच गेल्या काही वर्षांत नितेश राणे आणि वाद हे समानार्थी शब्द बनलेत...
अमेरिकेतून एमबीएची पदवी संपादन केल्यानंतर, नारायण राणेंचं बोट धरून नितेश राणे व त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. नीलेश राणे यांनी राजकारणात प्रवेश केला. युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, आरोग्य सेवा, नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नितेश राणेंनी 'स्वाभिमान संघटना' नावाची संघटना स्थापन केली. त्यांना मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीसपदही देण्यात आलं होतं. परंतु तत्कालिन युवक काँग्रेस नेतृत्वाशी पंगा झाल्यानं डिसेंबर 2008 मध्ये त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला... 2010 मध्ये नितेश राणे एकदम प्रकाशझोतात आले ते पाणी टँकर माफियांच्या विरोधात त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे... या टँकर माफियांची मुंबई महापालिकेतील सत्ताधा-यांशी युती असल्याचा आरोप त्यांनी केला...

ऑक्टोबर 2011 मध्ये नितेश राणेंनी परळच्या कामगार मैदानात भव्य असा रोजगार मेळावा घेऊन तब्बल 25 हजार बेरोजगार युवकांना नोक-या मिळवून दिल्या. त्यांच्या या कामगिरीची दखल गिनीज वर्ल्ड रेकॉर्डवाल्यांनीही घेतली... त्याशिवाय मराठी नाट्य आणि सिने उद्योगाशी संबंधित लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी 'महाराष्ट्र कलानिधी' नावाचा अभिनव उपक्रम सुरू केला...
परंतु एकीकडे चांगली कामे करताना नितेश राणे वादांच्या भोव-यातही सापडले. 2009 मध्ये अवधूत गुप्तेंच्या 'झेंडा' चित्रपटातील सदा मालवणकर नावाची व्यक्तिरेखा ही नारायण राणेंवर बेतलेली आहे, असा आक्षेप घेत त्यांनी चित्रपट प्रदर्शन रोखून धरले. अखेर सदा मालवणकरचे सदा पानवलकर असे नामांतर झाल्यानंतर झेंडा रिलीज झाला. चिंटू शेख नावाच्या कार्यकर्त्यावर केलेल्या कथित गोळीबार प्रकरणामुळे नितेश राणेंची पुरेपूर बदनामी झाली. अगदी मुंबई उच्च न्यालायलात आणि सीबीआयपर्यंत हा वाद पोहोचला. अखेर चिंटू शेख आणि नितेश यांच्यात 'मांडवली' होऊन हा वाद संपला... आपल्या युवा साप्ताहिकातून शिवसेना नेतृत्वावर आगपाखड करण्याची एकही संधी त्यांनी दवडली नाही. एकदी स्वतःच्या ट्विटर अकाऊंटवरून वादग्रस्त विधाने करून नितेशनी प्रत्येकवेळी वादाला फोडणी दिली. नरेंद्र मोदींची स्तुती करणा-या गुजराती लोकांनी गुजरातमध्ये चालते व्हा, अशा आशयाचे ट्विट त्यांनी ऑगस्ट 2013 मध्ये केले. त्यावरून काँग्रेस पक्षाची गोची झाल्याने उद्योगमंत्री नारायण राणे यांना सारवासारव करावी लागली. नरेंद्र मोदींची स्तुती केल्याबद्दल गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि गुजरातचा ब्रँड एम्बेसिडर असलेले महानायक अमिताभ बच्चन यांनाही नितेश राणेंच्या टिवटिवाटाचे 'प्रहार' सहन करावे लागले होते.

आता गोव्यातील चेकनाक्यावरील तोडफोड प्रकरणामुळे नितेश राणे पुन्हा गोत्यात आलेत... नारायण राणेंच्या कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी नितेशनी चालवलीय. पण त्याआधी आपल्या शीघ्रकोपी स्वभावावर नियंत्रण ठेवण्याचे बाळकडू नारायण राणेंनीच आपल्या शेंडेफळाला पाजण्याची गरज आहे...

ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई


No comments:

Post a Comment