Wednesday, October 1, 2014

शरद पवार खट्याळकी

२५ नोव्हेंबर २०१३
महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची जाण असलेले आणि सगळ्या प्रश्नांवरचे रामबाण उपाय जाणणारे एकमेव नेते म्हणजे शरद पवार... राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष.. शेतक-यांचे कैवारी कृषिमंत्री आणि मराठ्यांचा जाणता राजा... आले पवारांच्या मना, तेथे कोणाचे चालेना, असं म्हणतात. आपल्याला हवं ते मिळवण्याचं कसब पवारसाहेबांकडे आहे. मग वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवणं असो, नाही तर डॉलरमियांना अस्मान दाखवून बीसीसीआयचा कब्जा करणं असो... योग्यवेळी कोणता फासा फेकायचा आणि हुकूमाचा एक्का कधी वापरायचा, याचं टेक्निक शिकावं तर त्यांच्याकडूनच... बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले, असं संतांनी सांगितलंय... परंतु त्या काळात पवारांचा जन्म झालेला नव्हता... "जो मै नही बोलता, वो मै डेफिनेटली करता हूँ..." हे रावडी वचन ज्यांना तंतोतंत फिट्ट बसते ते पवारसाहेब... परंतु साहेबांचं एक स्वप्न मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही... ते म्हणजे देशाचं पंतप्रधानपद भूषवण्याचं... मराठ्याविना देशाचा राष्ट्रगाडा गेल्या 66 वर्षांपासून दिल्लीत हाकला जातोय... याचं शल्य त्यांच्या ऊरी रूतून बसलंय... लोकसभेच्या निवडणुका जवळ येतायत, तसं आपलं हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पवारांनी हिकमती सुरू केल्यात. एकीकडे काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीत मंत्रीपद भूषवायचं, आणि तिस-या आघाडीच्या मेळाव्यात आपली जागा अडवायला प्रॉक्सी पाठवायचा... काँग्रेससोबत लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करायची आणि यूपीए बाहेरील नेत्यांच्या उघडपणे भेटीगाठीही घ्यायच्या, अशा परस्परविरोधी कारवाया त्यांनी सुरू केल्यात. यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींसाठी पंतप्रधानपद सोडल होतं, पण आता तसा सुसंस्कृतपणा दाखवण्याची गरज नाही, असं बेधडक वक्तव्य पवारांनी परवा केलं... याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे - त्यांना सध्या पोपटाचा डोळाच तेवढा दिसतोय... काय म्हणता, यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी जाहीर केलंय.. मग काय झालं, बोलले तसं वागायला ते काय राजा हरिश्चंद्र थोडेच आहेत. आणि नाही तरी गेली 11 वर्षं राज्यसभेचाच माणूस देशाचा पंतप्रधान म्हणून राज्य करतोय ना... देवेगौडांसारखा हंबल शेतकरी पंतप्रधान होतो, मग पवारसाहेबांसारखा शेतक-यांचा कैवारी पीएम झाला तर बिघडलं कुठं...?

No comments:

Post a Comment