Wednesday, October 1, 2014

खट्याळकी अण्णा हजारे

९ डिसेंबर २०१३

करवटे बदलते रहे... सारी रात हम...
आप की कसम... आप की कसम...

शीलाआज्जी नाही, सोनियाबाईही नाहीत... नाही हो, राहुलबाबाही नाहीत... हे रडगाणं परवा गात होते 'आप'ले अण्णा... झालंय काय की, अण्णांची हल्ली झोपच उडालीय... राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात सारखं एका कुशीवरून दुस-या कुशीवर तळमळत होते अण्णा... पोटातही दुखू लागलंय त्यांच्या... काय झालं अण्णांना..? अहो, अरविंदच्या आम आदमी पार्टीचे 28 आमदार दिल्लीत निवडून येतील, यावर अण्णांचा विश्वासच बसत नाहीय.. कुणीही त्यांची मुलाखत घ्यायला गेला की, ते आधी स्वतःला चिमटा घ्यायला सांगतात... इथं राळेगणसिद्धीत निवडून यायची अण्णांना खात्री नाही. विधानसभेला उभा राहिलो तर आपलं डिपॉझिट जप्त होईल, हे अण्णांना पक्कं ठाऊक आहे. म्हणूनच अरविंदच्या राजकीय पक्षाला एवढं घवघवीत यश मिळाल्यानं त्यांचा म्हणे लोकशाहीवरचा विश्वासच उडत चाललाय... आपण मिळून राजकीय पक्ष काढूया, असं अरविंदनं पहिल्यांदा सुचवलं तेव्हा अण्णांनी त्याला धुडकावलं होतं. तरीही एकलव्यासारखी चिकाटी या शिष्यानं दाखवली... आप नावाचा पक्ष काढला... एएपी आप म्हणजे अण्णा अरविंद पार्टी... पण कुणीतरी अण्णांचे कान भरले होते. हा मारवाडी केजरीवाल तुमचा वापर करतोय, असं कुणीतरी अण्णांना सांगितलं... मग काय अण्णांनी काढलं फर्मान. तुझ्या प्रचारासाठी माझ्या नावाचा वापर नको... बिच्चारा अरविंद... त्यानं अण्णा अरविंद पार्टीचं आम आदमी पार्टी असं गुपचूप नामांतर करून टाकलं... 'मैं भी अण्णा' खोडून गांधी टोपीवर 'मैं हूँ आम आदमी' लिहिलं... काँग्रेसचं विसर्जन करा, हे बापूजींचं स्वप्न सत्यात साकारण्यासाठी अरविंदनं झाडू हातात घेतला... आणि खरोखरच निवडणुकीत 'हात की सफाई' करून दाखवली... गुरूलाही जे जमलं नाही, ते चेल्यानं करून दाखवलं... आता सगळेजण अरविंदचा उदो उदो करतायत, म्हणून अण्णा खट्टू झालेत... मी दोन-चार सभा घेतल्या असत्या तर अरविंद मुख्यमंत्रीच बनला असता, असं ते सांगू लागलेत.


No comments:

Post a Comment